यंदाच्या टोकीओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला संघाने इतिहास घडवला असून आज होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याकडे सर्व भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत.दरम्यान या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरु असताना आता एका हिरे व्यापाऱ्याने मोठी घोषणा केली आहे. सुवर्णपदक आणा आणि घर/गाडीच्या मालकीण व्हा, अशी घोषणा प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी केली आहे. उपांत्य सामन्याच्या पार्श्वभूमीवर ढोलकिया यांनी ट्वीट करून ही घोषणा केली आहे.
टोकीओ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारतीय महिला संघाचा आज अर्जेंटिनासोबत सामना होणार आहे. अर्जेंटिनाला नमवून अंतिम फेरीचे 'सुवर्णलक्ष्य' गाठण्याचं आव्हान महिला संघापुढे आहे. या उपांत्य फेरीतील सामन्याकडे भारतीयांच्या नजरा लागल्या असून, महिला हॉकी संघाचं मनोबल उंचावण्यासाठी हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी मोठी घोषणा केली आहे.
सावजी ढोलकिया यांनी एक ट्वीट केलं आहे. "मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, महिला हॉकी संघाने अंतिम सामना जिंकला, तर हॉकी संघातील महिला खेळाडूंना हरि कृष्णा ग्रुपच्या वतीने ११ लाख रुपयांचं घर किंवा नवीन कार भेट दिली जाईल. आपल्या मुली टोकीओ ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक पावलांवर इतिहास रचत आहेत, त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे", असं ढोलकिया यांनी म्हटलं आहे.
याच ट्वीटमध्ये ढोलकिया पुढे म्हणतात,"ज्या खेळाडूंकडे गाडी नाही, त्यांना ५ लाख रुपये गाडीसाठी दिले जातील. ज्यांच्याकडे घरं नाही त्यांना ११ लाख रुपये घरासाठी मदत देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांचं मनोबल वाढण्याबरोबरच निश्चय दृढ व्हावा हेच आमचं लक्ष्य आहे. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, हेच १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला हॉकी संघाला सांगायचं. आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढावा आणि त्यांनी देशाची मान उंचवावी म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे", असं सावजी ढोलकिया यांनी म्हटलं आहे.