भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. आज या कसोटीचा चौथा दिवस आहे. तिसरा दिवस रोहित शर्माने गाजवल्यानंतर भारताने आज आपला दुसरा डाव ३ बाद २९२ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजाराची लाभलेली साथ इंग्लंडसमोर दमदार आव्हान देण्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. रोहितने विदेशातील पहिलेच कसोटी शतक ठोकले, तर पुजाराने अर्धशतकी योगदान दिले. ही कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेट करण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडिया आपल्या प्रशिक्षकांशिवाय खेळत आहे.