आयपीएल २०२४ चा थरार येत्या २२ मार्चापासून सुरु होणार असून सर्वच खेळाडू मैदानात कंबर कसताना दिसत आहेत. अशातच भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची आयपीएल सुरु होण्याआधीच क्रीडाविश्वात तुफान चर्चा रंगली आहे. बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या अनबॉक्स इव्हेंटमध्ये विराट कोहलीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी विराट कोहलीने त्याच्या मनातील विचार स्पष्टपणे मांडले. मला किंग म्हणू नका, कृपया मला विराट म्हणून हाक मारा. मी याबद्दल फाफ डुप्लेसिसला म्हणालो, तुम्ही मला या शब्दाने हाक मारता त्यावेळी मला चांगलं वाटत नाही. त्यामुळे कृपया मला आतापासून विराट म्हणून हाक मारा. त्या शब्दाचा उच्चार करु नका. हे ऐकणं माझ्यासाठी खूप विचित्र आहे.
विराटन या इव्हेंटमध्ये महिला संघाचं कौतुक करत म्हणाला, जेव्हा त्यांनी फायनल जिंकली, त्यावेळी मी तो सामना पाहत होतो. आम्हीही या हंगामात त्यांच्यासारखी कामगिरी करु, अशी आशा आहे. जर असं झालं, तर आमचा आनंद द्विगुणीत होईल. कोहली खूप वेळापासून क्रिकेटपासून दूर आहे. परंतु, आता विराट आयपीएलच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. आयपीएलच्या इतिहास सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
या आयपीएलच्या हंगामातही विराट कोहली चमकदार कामगिरी करेल, असं चाहते सोशल मीडियावर सांगत आहेत.दरम्यान, यावर्षी टी-२० वर्ल्डकपही होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोहलीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. कोहली यंदाचा टी-२० वर्ल्डकप खेळणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. विराट कोहलीचा टी-२० सामन्यांतील स्ट्राईक रेट कमी असल्याने त्याची निवड होणं कठीण आहे, असं बोललं जात आहे. परंतु, या हंगामात विराट धावांचा पाऊस पाडून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वास चाहते व्यक्त करत आहेत. आरसीबीचा पहिला सामना २२ मार्चला सीएसकेविरोधात होणार आहे.