आयपीएलच्या पंधराव्या (IPL 2022) हंगामात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून सर्व सामने सुरळीत सुरु असताना आता दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capital) ताफ्यातील पाच जणांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाल्याचे समोर आले आहे. या कारणामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआयने दिल्ली-पंजाब (PBKS VS DC) यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले आहे. त्यामुळे आता मुंबईत लढत रंगणार आहे.
दिल्लीच्या (Delhi Capital) ताफ्यात एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाल्याचे १५ एप्रिल रोजी समोर आले होते. मसाज थेरेपिस्ट चेतन कुमार यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे १६ एप्रिल रोजी समोर आले होते. तर १८ एप्रिल रोजी दिल्लीचा खेळाडू मिशेल मार्श, टीमचे डॉक्टर अभिजित साळवी आणि सोशल मीडिया कंटेट टीमचे सदस्य आकाश माने या तिघांना करोना करोनाची लागण झाली होती. पाच जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे दिल्ली संघाने (Delhi Capital) आपला पुणे प्रवास तत्काळ रद्द केला होता.
या घटनेनंतर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capital) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होणारा सामना हा पुणेऐवजी मुंबईत खेळवला जाणार आहे. प्रवासादरम्यान करोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.