गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने पेनल्टी शूट-आऊटमध्ये कोलंबियाला ३-२ असे पराभूत करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना यजमान ब्राझीलशी होणार आहे. उपांत्य फेरीत ९० मिनिटे आणि ३० अतिरिक्त मिनिटांच्या खेळानंतर सामन्यात १-१ अशी बरोबरी होती.
त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने डाव्हिन्सन सांचेज, येरे मिना आणि एडविन कार्डोना या कोलंबियन खेळाडूंनी मारलेल्या पेनल्टी अडवल्या. तर कर्णधार लिओनेल मेस्सी, लिओनार्डो पारेडेस आणि लौटारो मार्टिनेझ यांनी चेंडू गोलजाळ्यात मारत अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला. या सामन्यात कोलंबियाने अर्जेंटिनाला चांगली झुंज दिली. दोन्ही संघांना गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या. सातव्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर लौटारो मार्टिनेझने गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पिछाडीवर पडलेल्या कोलंबियाने दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.