बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सध्या भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियासोबतच्या 4 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात नागपूर आणि दिल्ली कसोटीत कांगारुंवर शानदार विजय मिळवला. त्यासोबत आता तिसरा कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचे तिकीट मिळवण्याचा भारताचा उद्देश असेल. मात्र, या तिसऱ्या कसोटीआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतासोबतच्या टेस्ट मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अपयशी झुंज देताना दिसत आहे. या मालिकेत आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. मात्र, त्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलयाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. पॅटच्या आईची प्रकृती स्थिर नसल्याने त्याने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. याआधी पॅट इंदूर कसोटीआधी उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे आधीच झुंज देणारा ऑस्ट्रेलियाचा संघ आता पुन्हा मोठ्या अडचणीत सापडला आहे. इंदूर येथे होणार्या तिसर्या कसोटीसाठी परतणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
असे असेल पुढील सामन्यांचे वेळापत्रक
• तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च (इंदौर)
• चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)
• पहिली वनडे - 17 मार्च (मुंबई)
• दुसरी एकदिवसीय - 19 मार्च (विशाखापट्टणम)
• तिसरी एकदिवसीय - 22 मार्च (चेन्नई)
असा असेल तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.