इंग्लंडच्या 2019 विश्वचषकाचा नायक बेन स्टोक्सनं सोमवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा इंग्लंडचा (South Africa Vs England) सामना हा त्यांचा 50 षटकांच्या फॉरमॅटमधील शेवटचा सामना असेल, असं त्यांनं सविस्तर निवेदन जाहीर करत सांगितलं आहे. बेन स्टोक्सने आपल्या निवेदनात, "मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी माझा शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणं अत्यंत कठीण आहे. माझ्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडकडून खेळताना मला प्रत्येक क्षण आवडला. आम्ही एक अविश्वसनीय प्रवास केला आहे. हा निर्णय जितका कठीण होता, तितकं कठीण हे सांगणं नाही की, मी या फॉर्मेटमध्ये माझ्या संघसहकाऱ्यांना आता माझं 100% योगदान देऊ शकत नाही.
कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने इंग्लंडकडून 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2919 धावा केल्या असून 74 बळी घेतले आहेत. लॉर्ड्सवर 2019 च्या विश्वचषक फायनलमध्ये त्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केलेली सर्वोत्तम कामगिरी हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीचं वैशिष्ट्य होतं. या अंतिम सामन्यात त्यानं नाबाद 84 धावा करून इंग्लंडला 50 षटकांचा पहिला विश्वचषक जिंकून दिला.