क्रिकेटच्या खेळात चौकार आणि षटकार हे चाहते-खेळाडू आणि संघ या तिघांनाही आवश्यक असतात. क्रिकेटमध्ये कमी बॉलमध्ये जास्त रन्स करण्याचा टीमचा प्रयत्न असतो. त्यामुळे सिक्सला अधिक महत्त्व आहे. कारण, सिक्स मारल्यावर एका बॉलमध्ये 6 रन मिळतात. पण आता क्रिकेटमध्ये एक वेगळा नियम लागू करण्यात आला आहे. सिक्स मारणाऱ्या बॅट्समनला आऊट जाहीर करण्यात येणार आहे.
इंग्लंडमधील साऊथविक अँड शोरहॅम क्रिकेट क्लबनं एक अजब निर्णय घेतला आहे. जेव्हा कोणताही खेळाडू पहिला षटकार मारेल त्यावेळी त्याला वॉर्निंग दिली जाईल. ज्या संघाच्या खेळाडूनं षटकार मारला आहे त्यांना धावा मिळणार नाहीत. यानंतर जे खेळाडू षटकार मारतील त्यांना बाद केलं जाईल. याच्यामागचे कारण म्हणजेच, मैदानाजवळील नागरिकांनी त्यांच्या संपत्तीचं नुकसान होत असल्याची तक्रार केली होती. याशिवाय मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना दुखापत होण्याची आणि वाहनांच्या नुकसानाची संख्या वाढत असल्याने या क्लबने आता षटकार मारण्यावर बंदी टाकली आहे.
साऊथविक अँड शोरहॅम क्रिकेट क्लबनं हा नवा प्रयोग सुरु केला आहे. या नियमाचा फायदा क्लबला होऊ शकतो. यामुळं क्लबला आर्थिक भूर्दंड कमी प्रमाणात बसेल. मात्र, क्रिकेटमध्ये षटकार मारण्यावर बंदी घातल्यास खेळातील आनंद निघून जाण्याची शक्यता अनेक क्रिकेट प्रेमीने व्यक्त केली आहे.