नवी दिल्ली : आयसीसी टी-20 महिला विश्वचषक 2023 च्या पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलियन आणि भारतीय संघ यांच्यात केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर खेळला गेला. भारतीय संघ एक वेळी अतिशय शानदारपणे लक्ष्याचा पाठलाग करत होता, मात्र अचानक विकेट गमावल्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियन संघाने हा सामना 5 धावांनी जिंकला.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन महिला संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बेथ मुनी आणि अॅलिसा हिली या सलामीच्या जोडीने पहिल्या 6 षटकातच संघाची धावसंख्या 43 धावांवर नेली. यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का 52 धावांवर बसला. अॅलिसा हिली 25 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर बेथ मुनीने 37 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली. तर, ऍशले गार्डनरने 18 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली. मेग लॅनिंगने 34 चेंडूत 49 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 20 षटकांत 4 गडी गमावून 173 पर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय संघाकडून गोलंदाजीत शिखा पांडेने 2 तर राधा यादव आणि दीप्ती शर्माने 1-1 बळी मिळवले.
१७४ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाला पहिला धक्का शेफाली वर्माच्या रूपाने ११ धावांवर बसला. तर स्मृती मानधनाही १५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. 28 च्या स्कोअरवर भारतीय संघाला तिसरा धक्का बसला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने डाव सांभाळला आणि जेमिमाने आक्रमक फलंदाजी करत पहिल्या 6 षटकात धावसंख्या 59 धावांपर्यंत नेली. पण बाउन्सर चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात ती झेलबाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर 52 च्या धावसंख्येवर 2 धावा घेताना बाद झाली. तिच्या विकेटमुळे ऑस्ट्रेलियन संघाला पुनरागमनाची संधी मिळाली आणि भारतीय संघाच्या खेळाडूंवर वेग कायम ठेवण्याचे दडपण आले.