ॲडलेड ओव्हलवरील भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना अतिशय रोमांचक ठरला व अंतिम षटकापर्यंत पूर्ण प्रयत्न करूनही बांगलादेश अत्यंत दुर्दैवाने पाच धावांनी कमी पडला. या विजयानंतर भारत 'गट ब' मध्ये चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकत सहा गुणांसह प्रथमस्थानी आहे व त्यांना त्यांचं हे स्थान कायम ठेवण्यासाठी रविवारी (६ नोव्हेंबर) सुपर १२ टप्प्यातील अंतिम सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध विजय आवश्यक आहे.
बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज नुरुल हसन याने भारतीय माजी कर्णधार विराट कोहलीवर 'बनावट क्षेत्ररक्षण' केल्याचा आरोप केला आहे, 'ज्यावर मैदानावरील पंचांचं लक्ष गेलं नाही आणि त्यामुळे T20 विश्वचषक सामन्यात त्यांच्या संघाचा पाच धावांनी पराभव झाला.' असा त्याचा आरोप आहे.
बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज नुरुल हसन पुढे असंही म्हणाला की 'पंचांनी यावर कारवाई करून टीम इंडियाला दंड ठोठावला असता, तर सामन्याचा निकाल बांगलादेशच्या बाजूने लागला असता' मात्र कर्णधार शाकिब अल हसनने आपण चांगल्या पद्दतीने खेळल्याची भावना व्यक्त केली.
क्रिकेटच्या नियम 41.5 नुसार, अयोग्य खेळाशी संबंधित, 'जाणूनबुजून लक्ष विचलित करणे, फसवणे किंवा फलंदाजाला अडथळा आणणे' प्रतिबंधित आहे आणि जर एखाद्या नियमाचं उल्लंघन केलं गेलं, तर पंच त्या विशिष्ट चेंडूला डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात.
परंतु हा सर्व प्रकार घडल्यानंतर बांगलादेशचा कोणताही फलंदाज विचलित झाल्याचं दिसून आलं नाही . यामुळे नुरुलच्या आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात.