Gautam Gambhir Becomes Team India Head Coach : टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर राहुल द्रविड यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची कारकिर्द संपली. अशातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी गौतम गंभीरला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. गंभीर टीम इंडियाचा हेड कोच बनवणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून गंभीरच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघात काही युवा खेळाडूंना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तर संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
अजिंक्य रहाणे
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे मागील काही काळापासून फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे रहाणेचा टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये समावेश केला गेला नाही. वनडे आणि टी-२० फॉर्मेटमधून रहाणे यापूर्वीच संघातून बाहेर झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेचं पुनरागमन होईल की नाही, याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे टीमचा नवीन कोच युवा खेळाडूंना संधी देईल, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
चेतेश्वर पुजारा
रहाणेप्रमाणेच चेतेश्वर पुजारालाही क्रिकेटच्या मैदानात धावांचा सूर गवसलेला नाही. गेल्या काही काळापासून पुजारा टीमचा नियमित सदस्यही राहिला नाहीय. पुजाराचं वय ३६ वर्ष आहे. पुजाराच्या फिटनेसबाबतही सवाल उपस्थित केले जात आहेत. गंभीर कोच बनल्यानंतर जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रवींद्र जडेजा
टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू रवींद्र जडेजाही मागील काही काळापासून चमकदार कामगिरी करु शकला नाही. फलंदाजीतही त्याला अप्रतिम कामगिरी करता आली नाही. त्यामुळे गंभीरच्या नेतृत्वात जडेजाला वनडे क्रिकेट फॉर्मेटमधून बाहेर केलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आहे.