उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाचा शोध घेण्यासाठी कॉग्रेसने (Congress) उद्या बैठक बोलावली आहे. या बैठकीपुर्वी आज जी-23ची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अनेक माध्यमांनी गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याच्या आशयाची बातमी दिली होती. या बातमीवर आता थेट काँग्रेस (Congress) पक्षाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
रविवारी काँग्रेसच्या (Congress) कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात पाच राज्यांमधल्या निकालांवर चर्चा केली जाणार आहे. दुसरीकडे जी-२३ गटानं देखील पक्षाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याची वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकलं होतं. त्यानंतर यावर जोरदार चर्चा सुरू झाली. हा सगळा प्रकार व्हायरल झाल्यानंतर खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी यावर खुलासा करणारं स्पष्टीकरण दिलं आहे.
"वृत्तवाहिनीवर काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेलं वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक आहे. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारं वृत्त दाखवणं हे चुकीचं आहे. सत्ताधारी भाजपामुळे व्हायरल करण्यात आलेल्या चर्चेवर विसंबून हे वृत्त दाखवण्यात आलं आहे", असं ट्वीट रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी केलं आहे.