मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार सरकारच्या मालकीच्या कंपन्यांचे खाजगीकरण करण्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला निशाणावर धरले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारवर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
देशातील सर्व रस्ते हे राष्ट्रीय मालमत्ता आहेत. मात्र कोणी असं म्हटलं नाही की या रस्त्यावर केवळ सरकारी गाड्या चालल्या पाहिजे. रस्ते राष्ट्रीय मालमत्ता असली तरी त्यावर खाजगी गाड्या चालत ना?, असा प्रश्न त्यांनी खाजगीकरणाला विरोध करणाऱ्यांना विचारलाय. मात्र त्याचवेळी रेल्वेचे पूर्णपणे खाजगीकरण कधीच केलं जाणार नाही असंही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. ते मंगळवारी लोकसभेमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणुकीचं स्वागत केलं. "रेल्वेमध्ये खाजगी गुंतवणुकीचे स्वागत केलं पाहिजे. कारण असं झाल्यास अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होतील," असं गोयल यांनी म्हटलं. खाजगी रेल्वे गाड्यांची खाजगी गाड्यांशी तर लोहमार्गांची रस्त्यांशी तुलना करुन गोयल यांनी रेल्वेच्या खाजगीकरणाचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये केला.