लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (12 फेब्रुवारी) राज्यसभेत अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी 'दामाद' (जावई) असा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. राज्यसभेचे कामकाज 8 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले.
हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचा आहे. अनुभव आणि प्रशासकीय क्षमता अघोरेखित करणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1.67 कोटींहून अधिक घरांची निर्मिती झाली. हे काय श्रीमंतांसाठी आहे का? असा सवाल करत सीतारामन म्हणाल्या, सरकारवर वारंवार आरोप करण्याची काही विरोधकांना सवय आहे. देशातील गरीब आणि गरजवंतांच्या मदतीसाठी जी पावले उचलली जात आहेत, त्याच्याबाबत विपरित चित्र रंगवले जात आहे.
काँग्रेसवर त्यांनी हल्लाबोल केला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 27 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. हे सर्व गरीबांसाठी होते, 'दामाद' (जावई) नव्हते. मोदी सरकारने यूपीआयची सुविधा उपलब्ध केली, तसेच डिजिटल पेमेन्टला प्रोत्साहन दिले. हे कुणा क्रोनी -कॅपिटलिस्ट किंवा दामादच्या फायद्यासाठी होते का? काँग्रेसचा ट्रेडमार्क 'दामाद' (जावई) असेल, असे वाटले नव्हते. जावई तर प्रत्येक घरात झाला. पण काँग्रेसमध्ये एक स्पेशल नाव आहे, असे त्यांनी सांगताच विरोधकांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला.