नागपुरामध्ये (Nagpur) एक धक्कादायक प्रकार समोर आल आहे. नागपूरात सुराबर्डी जवळील म्हाडा क्वार्टर समोरील मैदानात एका 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. अत्यंत क्रूरपणे पेट्रोल टाकून जाळून तिची हत्या (Murder) करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
निकिता लखन चौधरी (Nikita Lakhan Chaudhary) असे 23 वर्षीय तरुणीचे नाव असून ती काल संध्याकाळपासून बेपत्ता होती. तिच्या आईने प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. आज संध्याकाळी निकिताचे जळालेले प्रेत वाडी पोलिस स्टेशन (Police station) अंतर्गत सुराबर्डी परिसरात एका मैदानात आढळून आले. निकिता नागपुरातील खामला परिसरात एका खाजगी कंपनी मध्ये काम करत होती. काल कार्यालयात गेल्यानंतर ती संध्याकाळी घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईने प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.
पोलीस तिचा शोध घेत असताना आज संध्याकाळी सुराबर्डी परिसरात रिकाम्या म्हाडा क्वार्टर समोरील मैदानात निकिताचे जळालेले प्रेत एका गावकऱ्याला दिसून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे निकिता काम करत असलेले खामला परिसरातील कार्यालय आणि तिचे जळालेले प्रेत सापडले ते सुराबर्डी परिसर बऱ्याच अंतरावर असून तिला त्या ठिकाणी कोणी नेले याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी निकिताच्या एका मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.