समीर महाडेश्वर, सिंधुदुर्ग | शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ३० हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता झाली आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर शरण येण्यास गोट्या सावंत यांना दहा दिवसांची सवलत सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. त्यानुसार मुदत संपण्यापूर्वी सावंत कणकवली न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यावर त्यानंतर न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. न्यायालयीन कोठडी झाल्यावर सावंत यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याबाबतची सोमवारी (ता.21 फेब्रुवारी) सुनावणी पूर्ण झाली होती असून सावंत यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सावंतांच्यावतीने वकील राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ऑनलाईन बाजू मांडली. न्यायालयाने आज (ता.22 फेब्रुवारी) यावर निर्णय दिला असून न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात जाण्यास बंदी घातली आहे. तसेच, दर सोमवारी ओरोस पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे.
याबरोबरच पोलिस तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे या अटीही घालण्यात आल्या आहेत.
दरम्यान, याप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचाही सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आली होती. यामुळे शिवसेना विरूद्ध राणे असा सामना रंगला होता. यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले होते.