गुजरात राज्यातील वापी येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा रेशनचा १० टन तांदूळ नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे गावाजवळ पोलिसांच्या विशेष पथकाने पकडला आहे. काळ्या बाजारात विक्रीस जाणारा रेशनचा १० टन तांदूळ पकडला गेला आहे. २०० तांदूळ कट्टयांसह ६ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन संशयीत ताब्यात घेण्यात आले आहेत.
उमराणे या मार्गे गुजरात राज्यातील वापी येथे शासकीय सार्वजनिक वितरणाचा ( रेशन ) तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने उमराणे गावाजवळ सापळा रचून हा ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत ५ लाख रुपये किमतीचे ५० किलो तांदुळाचे २०० कट्टे ( १० टन ) व दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.