अफगाणिस्तान देश 3 स्फोटांच्या घटनांनी हादरलंय… अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन स्फोट झाले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरीक यामध्ये जखमी झाल्याची माहिती समोर आलीये.आयसीस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य गेटवर ही घटना घडली. घटनेनंतर विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांची प्रचंड धावपळ सुरु आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काही वेळापूर्वीच विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या इराणच्या एका लष्करी विमानावर गोळीबार करण्यात आला होता.
अफगाणिस्तानवर काही दिवसांपूर्वीच तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरीदेखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर काही तासांच्या अंतरावर दोन बॉम्बस्फोट झाले.