औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आता आणखीन कडक निर्बंध लागू करण्यात आली आहेत. येत्या बुधवारपासून शहरातील हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. दरम्यान, हॉटेलमधील पार्सल सुविधा सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील प्रशासनाला तपासणी दरम्यान हॉटेल व रेस्टॉरंट आदी ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होण्याची भीती लक्षात घेत, डायनिंग व रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाष्टा सेंटर, ढाबे, फूड पार्क, रिसॉर्टमधील डायनिंग सुविधा आसनावर (बसून खाणे) पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ पार्सल सुविधा, टेक अवे किंवा घरपोच सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जेणेकरून गर्दीस प्रतिबंध करता येणार आहे. बुधवार १७ मार्च सकाळी ६ वाजेपासून ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पर्यटनस्थळे पुन्हा बंद
वेरुळ, अजिंठ्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ४ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी संयुक्तपणे दिले आहेत. तसेच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये असे नव्याने घातलेल्या निर्बंधात म्हटले आहे.