कोरोनाचा प्रादुर्भाव वर्षाच्या सुरुवातीपर्यंत नियंत्रणात आला होता. परंतु फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना रुग्णांची आकडे वाढतच आहेत. अशा वेळी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) या विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी दरात उपलब्ध व्हावे, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे.
कोरोनावर अजून कोणतेही योग्य औषध उपलब्ध नाही. मात्र तूर्तास तरी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. म्हणून त्याचाच जास्त वापर डॉक्टर करत आहेत. या औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सरासरी 1,040 रुपये (800 रुपये ते 1300 रुपये) या दराने केली जात असल्याचे आढळले आहे. तर दुसरीकडे, रुग्णांलयांकडून आकारण्यात येणाऱ्या याच्या किमतीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर 10 ते 30 टक्के अधिक रक्कम आकारतात, परंतु ही रक्कम छापील किमतीपेक्षा कमी असते. तर, बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसले.
हे ध्यानी घेऊनच एफडीएने याबाबतचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या घाऊक खरेदी किमतीवर जास्तीत जास्त 30 टक्के जास्त किंमत आकारण्याबाबत निर्देश शासनाने द्यावेत, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास रुग्णांना दीड हजार रुपयांपर्यंत हे इंजेक्शन उपलब्ध होईल.