उद्योगपती राज कुंद्रा यांनी मुंबई पोलिसांना लाच दिल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांना २५ लाखांची लाच दिल्याची माहिती आहे. याच प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मेल केला आहे.
राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. कुंद्रा यांना गुरुवारी दुपारी पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान आता अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)ला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासोबत असलेला आरोपी यश ठाकूर याचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. या मेलमध्ये त्यांनी शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांना २५ लाखांची लाच दिल्याचे आरोप केले आहेत. पॉर्न फिल्म प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांनी दावा केला आहे की पोलिसांनी राज कुंद्राला यापूर्वीच अटक केली असती.
पोलिसांनीही माझ्याकडूनही लाच मागितली होती, असा दावा यश ठाकूर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला ईमेल लिहून तक्रार केली होती, तसेच मला अटक होण्यापासून वाचविण्यासाठी माझ्याकडून २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एप्रिलमध्ये हे मेल मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवले होते आणि या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.