कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये 250 रुपयांना लस उपलब्ध करण्यात आली आहे. तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र यावरूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कोविड लसीकरणाच्या या टप्प्यात 60 वर्षे व त्यावरील व्यक्तींसोबतच 45 ते 59 वर्षांपर्यंतच्या व्याधीग्रस्त व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. या टप्प्याला कालपासून (1 मार्च) सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 250 रुपयांत खासगी रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेसाठी एकूण 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना जाहीर केले होते. यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
या 35 हजार कोटी रुपयांमध्ये 210 रुपये दराने तब्बल 1.5 अब्जाहून अधिक डोस खरेदी करता येतील आणि देशातील 75 कोटीहून अधिक प्रौढ व्यक्तींना दोनदा लस देता येऊ शकते. मग आता लसीसाठी 250 रुपये का आकारण्यात येत आहेत, असा सवाल पृ्थ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडा यासारख्या मोठ्या देशांमध्ये नागरिकांना एकतर विमा योजनेअंतर्गत किंवा अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूदीनुसार मोफत लस दिली जात आहे. भारतातही प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या (आयुष्मान भारत) सर्व लाभार्थ्यांना मोफत लस दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.