लोकशाही न्यूज नेटवर्क | देशात शेतकरी आंदोलन चांगलेचं पेटले असतानाचं चीनने भारतीय हद्दीत घूसखोरी सुरु केली आहे. ही घुसखोरी इतकी टोकाला गेली आहे कि, चीननं अरुणाचलमध्ये संपूर्ण गावचं वसवलं आहे. या संदर्भात समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोतून ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना अडवणूक करण्यापेक्षा भारतात सुरु असलेली चीनची घुसखोरी थांबवावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि सरकारमध्ये गुरुवारी झालेल्या दहाव्या बैठकीच्या फेरीत केंद्रसरकारने नमते घेत कृषी कायद्यांना वर्ष-दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळत, तिन्ही कायदे रद्द करावेत, तसेच किमान आधारभूत मूल्यास कायद्याचे संरक्षण द्यावे, या दोन मागण्यांशिवाय कोणत्याही पर्यायावर तडजोड न करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
या सर्व घडामोडींना देशात वेग आले असताना चीननं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. अरूणाचल प्रदेशात चीननं ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवलं असून, या गावात १०१ घरं बांधले असल्याचं सॅटेलाईट फोटो समोर आले होते. त्यामुळे केंद्र सरकार जितकी तत्परता शेतकरी आंदोलकांना आंदोलन करण्यापासून अडवण्यासाठी करतेय तितकी तत्परता त्यांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या चीनला दाखवावी. आणि चीनला भारतातून हुसकावून लावावे अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे.
चीननं भारतालाचं सुनावलं
भारतात घूसखोरी करणाऱ्या चीननं भारतालाचं खडेबोल सुनावले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. असं असलं तरी अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भाग असल्याचा दावा सातत्यानं चीनकडून करण्यात येत आहे.आम्ही कधीही तथाकथित अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही. आम्ही आमच्या भूभागावर चीनची विकासकामं करणं आणि बांधकाम करणं सामान्य आहे. हे आमचं क्षेत्र आहे त्यामुळे दोष देता येणार नाही," अशी प्रतिक्रिया चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी माध्यमांशी बोलताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.