केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) मुंबई महापालिकेनं (BMC) नोटीस पाठवली आहे. राणेंच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी पालिकेनं नोटीस बजावली आहे. शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांनी बंगल्याच्या बांधकामाची पाहणी केली. याप्रकरणी नारायण राणे यांनी महापालिकेच्या नोटीसला प्रत्युत्तर देण्यासाठी आज (19 फेब्रुवारी ) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आले. यावेळी दिशा पाटनीच्या हत्येचा खुलाशा सुशातसिंह करणार होता, त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप राणे यांनी केला.
पालिकेच्या के-पश्चिम वॉर्डनं नारायण राणेंना (narayan rane) मुंबई महापालिका (BMC) कायदा, १८८८ च्या कलम ४८८ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. चार वर्षांपूर्वी तक्रार करूनही बंगल्याच्या अनधिकृत (Unauthorized) बांधकामावर कारवाई करत नसल्याची आठवण माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पालिकेला करून दिली. त्यानंतर पालिकेनं राणेंना नोटीस पाठवली आहे. अधिश बंगला गेल्या काही वर्षांपासून वादात आहे. सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून बंगल्याचं बांधकाम झाल्याचं दौंडकर यांनी सांगितलं. हा बंगला समुद्र किनाऱ्यापासून ५० मीटरवर आहे. त्यामुळे सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दौंडकर म्हणाले.
बंगल्याच्या तपासणीनंतर अनधिकृत बांधकामं आढळून आल्यास आणखी एक नोटीस बजावण्यात येईल. बंगल्याची वैधता दाखवून देण्यासाठी त्यांना ठराविक वेळ देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कायदेशीर कागदपत्रे दाखवण्यात अपयशी ठरल्यास पाडकामाची कारवाई करण्यात येईल, असंदेखील अधिकाऱ्यांनी सांगितलं.