देशभरात इंधनाचे दर प्रचंड वाढलेले असले तरी नव्या वर्षात झारखंडमध्ये पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे. येत्या 26 जानेवारीपासून झारखंडमध्ये बीपीएल कार्ड धारकांना पेट्रोलचे 25 रुपयांनी स्वस्त देण्यात येणार आहे.
झारखंडमध्ये पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची वारंवार मागणी केली होती. असोसिएशनने पेट्रोल- डिझेलवरील व्हॅट 5 टक्क्याने कमी करण्याची मागणी केली होती. व्हॅटचा दर 22 टक्क्यावरून 17 टक्के करावा. त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल. झारखंडच्या बाजूलाच असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशात डिझेलच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे झारखंडमधील वाहनचालक शेजारील राज्यात जाऊन डिझेल भरत आहेत. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान होत आहे, असं या असोसिएशनने म्ह्टलं होतं.
अनेक शहरात पेट्रोलची शंभरी
देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले असून, दररोज सुमारे 35 पैशांनी महाग होत आहे. काही शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपयांवर पोहोचला. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक उत्पादन शुल्क लावते. गेल्या वर्षी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.98 रुपयांवरून 32.9 रुपये प्रति लिटर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे डिझेलवरील शुल्क 31.80 रुपये प्रति लीटर करण्यात आले.