पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी तालकटोरा स्टेडियममध्ये 1000 विद्यार्थी उपस्थित आहेत. तसेच विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आज टेन्शनमुक्त होऊन परीक्षा देण्याचा कानमंत्राही दिला. त्याचबरोबर या कार्यक्रमात सरकारने काहीही केलं तरी विरोध होतोच असा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला देखील लगावला आहे.
पीएम मोदी म्हणाले की, ' हा कार्यक्रम मला खूप प्रिय आहे, परंतु कोरोनाच्या काळात तुम्हाला त्यापैकी बहुतेकांना भेटता आलं नाही. हा माझ्यासाठी आनंददायी कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी तुम्हा सर्वांना भेटलो. मला वाटत नाही की, तुम्ही परीक्षेला घाबराल. तुमच्या पालकांना परीक्षेची भीती वाटेल. अनेक पालकांना मुलांपेक्षा जास्त टेन्शन आहे.
परीक्षा ही आयुष्यातील साधी गोष्ट
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मनात तयार करा की, परीक्षा जीवनाची साधी गोष्ट आहे. आपल्या विकास यात्रेचे हे लहान टप्पे आहेत. या टप्प्यातून आम्हीही गेलो आहोत. यापूर्वीही आम्ही अनेकदा परीक्षा दिली आहे. जेव्हा हा विश्वास निर्माण होतो. पुढच्या काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हा अनुभव ताकद म्हणून कामी येतो."
ऑनलाइन अभ्यास करण्याचे आव्हान!
खिल्ली उडवत पंतप्रधानांनी विचारलं, तुम्ही ऑनलाइन अभ्यास करताना अभ्यास करता की, रील पाहता? हे ऑनलाइन-ऑफलाइनबद्दल नाही, तर एकाग्रतेबद्दल आहे. PM म्हणाले की, दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ काढा, जेव्हा तुम्ही ऑनलाइन/ऑफलाइन ऐवजी 'इनरलाइन' असाल.
अनुकरण करू नका
एक व्यक्ती असं करतो म्हणून आपणही असंच करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मित्राला चांगले मार्क मिळतात त्यामुळे तुम्ही ही त्याच्या सारखं करायला जाता. तुमचे मित्रं जे करतात ते करू नका. तुम्ही सहजतेने परीक्षाल सामोरे जा. तुमची ताकद तुम्ही ओळखा. तुमच्या पद्धतीने परीक्षेचं नियोजन करा. अनुकरण करू नका, असं ते म्हणाले.
परीक्षेलाच उत्सव करा
तुम्हाला टेन्शन नाही ना? असेल तर तुमच्या कुटुंबाला असेल. टेन्शन कुणाला आहे? तुम्हाला की तुमच्या आईवडिलांना? ज्यांना टेन्शन आहे त्यांनी हात वर करा. तुम्हाला टेन्शन असेल तर हात वर करा. आईवडिलांना टेन्शन असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हातवर करा, असे सवाल करत मोदींनी संवादाला सुरुवात केली. सण उत्सवाच्या काळात परीक्षा आल्या आहेत. त्यामुळे सणाची मजा घेता येत नाही. पण परीक्षेला उत्सव केलं तर त्यात अनेक रंग भरले जातात. ते रंग भरण्याचं काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.