लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकूण 119 मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात 7 जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण तर, 102 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री, उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण तर, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान), कला क्षेत्रात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) (तामिळनाडू), बी. एम. हेगडे (कर्नाटक), वैज्ञानिक नरेंद्र सिंह कपानी (मरणोत्तर) (अमेरिका), मौलाना वहिदुद्दीन खान (दिल्ली), पुरातत्व तज्ज्ञ बी. बी. लाल (दिल्ली), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू (ओडिशा) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, उद्योग क्षेत्रासाठी रजनीकांत श्रॉफ (महाराष्ट्र), केशुभाई पटेल (मरणोत्तर) (गुजरात), दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) (बिहार), सुमित्रा महाजन (मध्य प्रदेश), तरुण गोगोई (मरणोत्तर) (आसाम) यांच्यासह 10 जण पद्मभूषणचे मानकरी ठरले आहेत.
तर, श्रीकांत दातार (अमेरिका), कला क्षेत्रासाठी परशुराम गंगावणे, साहित्याबद्दल नामदेव कांबळे, उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल जसवंतीबेन पोपट, सामाजिक कार्याबद्दल गिरीश प्रभुणे आणि सिंधुताई सपकाळ यांच्यासह 102 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे.