सोशल मीडियामुळे चर्चेत आलेल्या दिल्लीच्या बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्यूबर गौरन वासव याने कांता प्रसाद यांचा व्हिडीओ शूट करत त्यांची परिस्थिती सांगितल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यावरुन नंतर अनेक वाददेखील झाले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "गुरुवारी रात्री सव्वा ११ वाजण्याच्या सुमारास ८१ वर्षीय कांता प्रसाद सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्य तसंच झोपेच्या गोळ्या एकत्र घेतलं होतं. त्यांच्या मुलानेही जबाबात हीच माहिती दिली आहे. रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचं म्हटलं आहे." पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.