कढीपत्ता हा आहारातला असा भाग आहे जो नसला तर पदार्थ बेचव लागतो. कढीपत्त्याचे सेवन करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे केस, त्वचा, आरोग्य या प्रत्येकावर उपाय मिळतो. कढीपत्त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स या पौष्टिक घटकांमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. पण काही जण पदार्थांमध्ये असणारा कढीपत्ता वेगळा करतात आणि त्याचे सेवन करत नाही. या कारणांमुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कढीपत्त्यापासून बनवली जाणारी झणझणीत कढीपत्ता चटणी.
कढीपत्ता चटणीसाठी लागणारे साहित्य:
कढीपत्ता
तेल
लाल सुक्या मिरच्या
उडीद डाळ
मीठ
जिरं
लसूण
शेंगदाणे
सुकं खोबरं
चणा डाळ
कढीपत्ता चटणी बनवण्याची कृती:
सर्वप्रथम कडीपत्त्याची पाने पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. नंतर कढईत तेल गरम करा आणि त्यात २ ते ३ लाल सुक्या मिरच्या भाजून घ्या. यानंतर त्यात उडीद डाळ, शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे किस, भाजलेले चणा डाळ यासर्व गोष्टी भाजून घ्या. भाजलेले साहित्य प्लेटमध्ये बाजूला काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि चिंच घाला. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घ्या.
नंतर त्यात कडीपत्त्याची पाने घालून परतून घ्या. यानंतर सर्व साहित्य मिक्सरला लावून वाटून घ्या. अशा प्रकारे कढीपत्त्यापासून बनवली जाणारी झणझणीत कढीपत्ता चटणी तयार होऊल. या चटणीचा आनंद खिचडी आणि भाकरीसोबत घेऊ शकता.