चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपण नववर्ष आणि गुढी उभारुन साजरा करतो. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होत आहे. तसेच, ही तारीख ९ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरी गोडधोडाचे जेवण केले जाते. या दिवशी विशेष महत्व असते ते म्हणजे गुढीला बांधण्यात येणाऱ्या साखरेच्या गाठी. तर आज आपण जाणून घेऊया या साखरेच्या गाठी कशा तयार केल्या जातात.
साखर - १ कप
दूध - १/२ टेबलस्पून
तूप - १ टेबलस्पून
खायचा रंग
पाणी - १/२ कप
गाठी तयार करण्याचा साचा
धाग्याची गुंडी
साच्याला आतून तूप लावून घ्यावे. साच्यांमध्ये एक लांबसर धागा ठेवा जसे की त्याची माळ तयार होईल. त्यानंतर भांड्यात साखर घेऊन त्यात अर्धा कप पाणी घालावे. हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर ठेवून चमच्याने ढवळत राहावे. त्याचा पाक तयार होईल.
त्यानंतर साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्यांत अर्धा चमचा दूध घालावे. हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे. जर आपल्याला रंगीत गाठ्या हव्या असतील त्यात फूड कलर घालावा. हा साखरेचा पाक साच्यांमध्ये ओतताना बरोबर धाग्यांवर ओतावा. ३ तास हा पाक सुकण्यासाठी ठेवावा. पाक संपूर्णपणे सुकल्यानंतर या गाठी हातांनी काढून घ्याव्यात. गुढी पाडव्यासाठी या साखरेच्या गाठी तयार आहेत.