अध्यात्म-भविष्य

श्रावणी सोमवार: शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

मूठभर असले तरीही ते देता आले पाहिजे. दिल्याने कमी होत नाही तर वाढते, हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे.

Published by : Team Lokshahi

श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भूत परंपरा मानली गेली आहे.

शिवामूठ श्रावणातला मोठा वसा

प्रत्येक मुलीला वाटते की, आपण जेव्हा सासरी जातो, तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी, असे सांगितले जाते.

श्रावणी सोमवारी शिवमुष्टीचे व्रत

लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू (पाचवा श्रावणी सोमवार) यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असतो. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ असा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी, असे म्हटले जाते.

दानाचे महत्त्व सांगणारी शिवामूठ

आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत-वैकल्ये महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो, ते अशा व्रतांमधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणीना समाधान मिळते. मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रत-वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी, असे सांगितले जाते.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...