शुभम कोळी | ठाणे : रक्षाबंधन सण बुधवार ३० ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. या दिवशी भद्राकाल असल्याने राखी बांधली तर वाईट होईल, अशा अफवा पसरल्या आहेत. त्यात काहीही तथ्य नाही, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. जर मंत्रोपचार, पूजा, धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर तो भद्रा काळ असताना केला जात नाही. त्या दिवशी सकाळी १०:५८ ते रात्री ९:०२ भद्रा काळ आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा तसेच धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असा मेसेज व्हायरल होत आहे. त्यात काहीही तथ्य नाही, असे दा.कृ.सोमण यांनी सांगितले. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा बुधवार ३० ऑगस्ट रोजीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रक्षाबंधन विधीवत पूजा करून मंत्रोच्चाराने साजरी करायची असेल तर रेशमी वस्त्रात अक्षता, सुवर्ण, दूर्वा, चंदन, केशर आणि सरसूचे दाणे घालून पोतडी करून ती बांधायची असते. हा विधी बुधवार ३० ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी भद्रा संपल्यावर करायचा आहे. मात्र, आपण जी राखी बांधतो त्याला भद्रा काल वर्ज्य नाहीये. आपण जो सण साजरा करतो तो सामाजिक आहे, कौटुंबिक आहे. त्याला भद्रा काळ पहायची गरज नाही. या कौटुंबिक/ सामाजिक सोहळ्याला वेळेचे बंधन नाही. बुधवार ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस रक्षाबंधन सोहळा साजरा करता येईल, असेही सोमण म्हणाले आहेत.