रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा हा एकामागोमाग येणारा असा सण आहे. यंदा नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन 30 ऑगस्ट 2023 तारखेला आहे. अनेकदा खूप जण नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन याच्यामध्ये गोंधळ घालतात. पण दोन्ही सणांचे महत्व हे वेगळे आहे. नारळीपौर्णिमा हा कोळीबांधवांशी संबधित असा सण आहे. कारण हा सण समुद्राशी असलेले नाते आणि त्याचे ऋण फेडणारा असा दिवस असतो. त्यामुळे हा दिवस कोळी बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात. पण नारळीपौर्णिमा कोळीबांधव कसा साजरा करतात आणि त्या सणाचे नेमके महत्व काय ते आता आपण जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया नारळीपौर्णिमेची माहिती. या शिवाय तुमच्या भावंडाना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.
नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते?
नारळी पौर्णिमा हा श्रावणात येणारा दुसरा मोठा सण आहे. नागपंचमीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. आपली हिंदू संस्कृती ही कृतज्ञता आणि सहिष्णूतेवर आधारलेली आहे. त्यामुळे निसर्गाने दिलेल्या गोष्टींची कृतज्ञता आपण बाळगायला अजिबात विसरत नाही. समुद्र किनारी राहणारे लोक हे बहुतांशी कोळी असतात. त्यांचा आणि समुद्राचा खूपच जवळचा असा संबंध आहे. त्यांचे पोट हे मासेमारीवर अवलंबून असते. त्यातूनच ते कमाई करतात. पण पावसाच्या काळात समुद्र हा उसळलेला असतो. याकाळात मासेमारी बंद असते. पण कालांतराने त्याचे रौद्र रुप हे कमी होऊ लागते. बंद केलेली मासेमारी पुन्हा सुरु करण्यासाठी आणि समुद्राला शांत करण्यासाठी त्याला नारळ अर्पण केला जातो. म्हणूनच या सणाला 'नारळी पौर्णिमा' असे म्हटले जाते .
नारळ अर्पण करण्याची पद्धत हिंदू धर्मात आहे. कोणतेही शुभकार्य असेल तर आपल्याकडे अगदी हमखास नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे. हा नारळ समुद्राला म्हणजेच जलदेवतेला अर्पण केला जातो. याला 'श्रीफळ' असे म्हणतात. यातील श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे नारळ. याला आपल्या धर्मात खूपच जास्त मान्यता दिली जाते. नारळ हा अनेक औषधी गुणांनी युक्त असतो. त्यापासून मिळणारे पाणी आणि खोबरे हे चवीला जितके चांगले असते त्याहून अधिक ते आरोग्यास चांगले असते. याशिवाय नारळी पौर्णिमा साजरा करण्याचा उद्देश म्हणजे श्रावणात आलेला बहर . या दिवसात सगळीकडे हिरवाई नटलेली असते.त्यामुळे निर्सगाचेही आभार मानणे फारच जास्त गरजेचे असते.
कोळी बांधव नारळी पौर्णिमा सण असा साजरा करतात.
आता नारळी पौर्णिमा हा सण परंपरागत साजरा केला जाणारा असा सण आहे. या दिवशी कोळी बांधव आपला पारंपरिक वेष घेतात. भरपूर दागिने घालतात. सजून धजून हा सण साजरा केला जातो. कोळीबांधव या दिवसासाठी आपल्या बोटी देखील रंगवून स्वच्छ करुन दर्यात जाण्यासाठी तयार करुन ठेवतात. इतकेच नाही तर संध्याकाळी समुद्राची पूजा करताना नारळाला सोनेरी रंगाचा कागद लावला जातो. सोन्याचा नारळ अर्पण करण्याची ही पद्धत आहे. पण आताच्या काळात सोन्याचा नारळ वाहणे हे अजिबात शक्य नाही.त्यामुळे त्याचे प्रतिकात्मक रुप म्हणून सोन्याचा कागद गुंडाळून नारळ वाहिला जातो. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि आनंद साजरा केला जातो.