Ganeshotsav 2023: दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षीदेखील गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होणार आहे. सगळीकडेच गणेशोत्सवाची तयारी सुरु असून गणरायाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आतुर असतात. असं म्हणतात की, जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गणेशोत्सवा दरम्यान भाविक सलग 10 दिवस संपूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात.
यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी येत आहे. आणि गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी आहे.
गणपती स्थापना मुहूर्त 2023 :
गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.39 वा. सुरु होणार असून तर 19 सप्टेंबर 2023 दुपारी 1.43 वाजेपर्यंत गणेश चतुर्थीचा काळ आहे. या काळात तुम्ही गणेश्याची मूर्ती आपल्या घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठा करू शकता.
मात्र प्राणप्रतिष्ठेसाठीची शुभ वेळ : 19 सप्टेंबरला सकाळी 11:07 ते दुपारी 01:34 असेल.
गणेशमूर्ती आणताना खालील गोष्टी लक्षात ठेवा...
गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना काही गोष्टी या आवश्यक मानल्या गेल्या आहेत. गणपतीच्या मूर्ती ही मूषकाविना नसावी. मूषक गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचा समावेश हा असायलाच हवा. यानंतर गणपतीच्या हातामध्ये शस्त्रे असावीत. तसेच गणपतीचा एक हात आशीर्वाद देतानाच्या स्थितीत आणि दुसरा मोदक स्वीकारण्याच्या स्थितीत असावा, असे सांगितले जाते.
गणपती बाप्पाचा घरात प्रवेश कसा करावा?
श्रीगणेशाचा आनंदाने आणि विधिवत घरात प्रवेश करावा. गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि दरवाजा सजवावे आणि ते जिथे गणपतीची स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करून पूजेसाठी तयार करावी. गणपती आणण्यासाठी जाण्यापूर्वी नवीन वस्त्र धारण करावे, डोक्यावर टोपी किंवा साफा घालावा. पितळ किंवा चांदीचं ताम्हण सोबत न्यावं. लाकडी पाट देखील सोबत घेऊन जाऊ शकता. त्यावर गणेशाची मूर्ती विराजित करुन घरात प्रवेश करावं. सोबत घंटा किंवा इतर वाद्य यंत्र घेऊन जावे. बाजारात गणपती घेताना मोलभाव करु नये. त्यांना आमंत्रित करुन दक्षिणा द्यावी. नंतर गणपतीची मूर्ती वाजत-गाजत आणावी आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी दारावर आरती ओवाळावी. मंगल गीत तसंच मंत्रांचे उच्चारण करावे.
गणेश स्थापना कशी करावी?
गणपतीची मूर्ती स्थापित करण्यापूर्वी ईशान कोपरा स्वच्छ करुन कुंकुाने स्वस्तिक तयार करावे आणि हळदीने चार ठिपके काढावे. नंतर अक्षता ठेवून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर लाल, पिवळा, किंवा केशरी रंगाचं आसान घालावं. त्याला चारी बाजूने फुलं आणि आंब्याच्या पानांनी सजवावं आणि पाटासमोर रांगोळी काढावी. तांब्याच्या कळशात पाणी भरुन त्यावर नारळ ठेवावं. जवळपास सुवासिक उदबत्ती, आरतीची थाळ, आरती पुस्तक, प्रसाद सर्व वस्तूं ठेवून घ्यावं. आता कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन ॐ गंगणपते नम: चा उच्चारण करत मूर्तीला पाटावर विराजित करावं. आता विधीपूर्वक पूजा करुन आरती करावी आणि प्रसाद वितरित करावा.