आज आषाढी अमावस्येदिवशी श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांगल्याचं प्रतिक असलेल्या दिव्याची पूजा करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आज (28 जुलै) महाराष्ट्रात दीप अमावस्या साजरी केली जात आहे. भारतीय संस्कृतीत अंधार दूर करुन प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्याला अत्यंत महत्त्व आहे. संध्याकाळी देवासमोर, तुळशीसमोर दिवा लावून घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करणे, हा आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेला संस्कार आहे. आजही आपण सायंकाळी देवासमोर दिवा लावून देवाला नमस्कार करतो. पूर्वी वीज नसल्याने अंधार दूर करण्यासाठी देवासमोर, तुळशीसमोर लावलेला दिवा महत्त्वाचा होता. मात्र आता विजेच्या दिव्यांचा झगमगाट असताना हेच दिवे मनातील अंधार, नैराश्य दूर करून सुखद आणि पवित्र वातावरणाची निर्मिती करतात.
का साजरी करतात दीप अमावस्या?
आपल्या संस्कृती अनेक लहान मोठे सण विविध अर्थ घेऊन येतात. असाच एक सण म्हणजे दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते.
पूर्वी श्रावणात अंधारून येत असे आणि भरपूर पाऊस पडत असे. त्यामुळे पुढील बदलणाऱ्या हवामानाची पूर्वतयारी म्हणून घरात असलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस. त्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचा रिवाज सुरु झाला असावा. आषाढी अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो पुढील व्रत वैकल्यांच्या काळात मद्यपान, मांसाहार वर्ज्य केला जातो त्यामुळे गटारी अमावस्या साजरी करून चमचमीत पदार्थांवर ताव मारला जातो.
कशी करावी दिव्यांची पूजा?
दीप अमावस्ये दिवशी सर्व दिवे घासून पुसून चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी. फुलांची आरास करावी. सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. त्यानंतर सर्व दिव्यांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. दीप अमावस्येला खीर-पुरीचा नैवेद्य करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे.
मुलांना ओवाळलं जातं
अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा यासाठी पूजा केली जाते.
या दिवसाचे महत्व काय?
दीप अमवास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती, आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणाही करतात. या दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवैद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं.