अमरावती, यवतमाळ आणि सातारामध्ये कोरोनाचा परदेशी स्ट्रेन आढळल्याची माहिती गेल्या काही दिवसापासून पसरत आहे. मात्र या माहितीवर आता राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. असे कोणतेही रुग्ण आढळले नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
अमरावती, यवतमाळ आणि सातारा या जिल्ह्यात कोरोनाचा ब्राझीलमधील परदेशी स्ट्रेन आढळल्याची माहिती पसरली होती. यानंतर अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.