गाझियाबादमधील दसना देवी मंदिराचे पीठाधीश्वर आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या नरसिंहानंद यांनी केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला विरोध केला आहे. वादग्रस्त विधान करत त्यांनी हिंदूंना या मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. 'या देशात तिरंग्याच्या नावाने मोठी मोहीम सुरू आहे. ही मोहीम भारतातील सत्ताधारी पक्षाकडून चालवली जातेय. तिरंगा बनवण्याची सर्वात मोठी ऑर्डर बंगालमधील सलाउद्दीन नावाच्या मुस्लिमाच्या मालकीच्या कंपनीला देण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठे ढोंगी हिंदू आहेत. हिंदूंचे दलाल मुस्लिमांच्या आर्थिक बहिष्काराबद्दल बोलतात, हिंदूंनी मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाकावा अशी ओरड करतात, मात्र सरकार स्थापन केल्यानंतर ते मुस्लिमांना सरकारी कंत्राटंही देतात अशी टीका त्यांनी केली आहे.
ही मोहीम हिंदूंविरुद्धचं षड्यंत्र : गिरी
यती नरसिंहानंद गिरी म्हणाले, 'ही मोहीम म्हणजे हिंदूंविरुद्धचे षड्यंत्र आहे. हिंदूंनो! जगायचं असेल तर मुस्लिमांना पैसे देऊन चालणाऱ्या या मोहिमेवर बहिष्कार टाका. घरी तिरंगा लावायचा असेल तर जुना तिरंगा लावा, पण सलाउद्दीनला असा एक पैसाही देऊ नका.'
प्रत्येक हिंदूच्या घरी भगवा असावा : गिरी
नरसिंहानंतर गिरी पुढे म्हणाले, या नेत्यांना धडा शिकवा. 'जेव्हा कोणताही हिंदूंचा पैसा कोणत्याही मुस्लिमाकडे जातो तेव्हा तो जिहादसाठी जकात देतो आणि तोच जकातचा पैसा हिंदूंच्या मुलांना मारण्यासाठी वापरला जातो. तिरंग्यावर बहिष्कार घाला, कारण या तिरंग्याने तुमचा नाश केला आहे. प्रत्येक हिंदूच्या घरी नेहमी भगवा ध्वज असावा. सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या यती नरसिंहानंद गिरी यांचा हा व्हिडिओ मंदिर परिसराचाच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सुमारे 15 दिवस जुना आहे आणि आता तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गिरी यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.