एकाच वर्गाची लोकसंख्या वाढल्यानं अराजकता येईल, लोकसंख्येचा समतोल राहणं आवश्यक आहे असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे. ज्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे, तिथे लोकसंख्येचा समतोल राहत नाही, हा चिंतेचा विषय बनतो. कारण धार्मिक लोकसंख्येवर विपरीत परिणाम होतो, नंतर काही काळानंतर अराजकता निर्माण होते. त्यामुळे लोकसंख्या स्थिरीकरणाच्या प्रयत्नांबरोबरच धर्म, वर्ग, संप्रदाय याविषयीची सर्व मतं सारखीच जोडली गेली पाहिजेत असं योगी म्हणाले आहेत.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, लखनऊ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमापूर्वी, मुख्यमंत्री योगी यांनी लोकसंख्या स्थिरीकरण पंधरवड्याची सुरुवात करून जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी सीएम योगी म्हणाले की, जेव्हा कुटुंब नियोजन, लोकसंख्या स्थिरीकरणाचा विचार केला जातो. तेव्हा आपण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की, लोकसंख्या नियंत्रित करण्याचे प्रयत्न यशस्वी झालेच पाहिजेत, परंतु लोकसंख्येच्या असंतुलनाची परिस्थिती कुठंही उद्भवू नये याची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही एका वर्गाची लोकसंख्या वाढवण्याचा वेग जास्त आणि जे मूळ आहेत, त्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न असं होऊ नये असं मत योगी आदित्य नाथांनी व्यक्त केलंय.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, उत्तर प्रदेशने गेल्या पाच वर्षांत उत्कृष्ट निकाल दिले आहेत. अशक्त मांतांची टक्केवारी आज 51.1% वरून 45.9% वर आली आहे. 5 वर्षात संपूर्ण लसीकरण 51.1% वरून 70% पर्यंत वाढलं आहे. संस्थात्मक वितरणाचा दर जो पूर्वी 67-68% होता तो आज 84% वर गेला आहे. माता-बालमृत्यूवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांना चांगले परिणाम मिळाले आहेत. आंतरविभागीय समन्वय आणि जनजागृतीच्या प्रयत्नांनी राज्य निश्चितपणे आपल्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी होईल असा विश्वास योगींनी व्यक्त केला आहे.