'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत तीन हप्त्यांचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर, दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जाणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे दिले जाणार होते. परंतु, ठरलेल्या तारखेच्या आधीच सरकारने बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी करायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, जैल महिन्यापासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या योजनेकरता अर्ज करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली. अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढत गेल्याने आणि काही तांत्रिक अडचणींमुळे अर्जदारांचा खोळंबा झाल्याने सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली. त्यामुळे दोन कोटींहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 14 ऑगस्टपासून खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. तर, सप्टेंबर महिन्यातील पैसे 1 ऑक्टोबर रोजी खात्यात जमा झाले. पहिल्या दोन महिन्यांचे पैसे ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे मिळाले नव्हते त्यांनाही ऑक्टोबर महिन्यांत या योजनेतील पैसे मिळाले. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 2 ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, 1,96,43,207 महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे देण्यात आले होते. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 2 कोटी 20 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.”
दरम्यान, जुलै ते सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा सन्मान निधी महिलांना प्राप्त झाल्यावर राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचे वचन सरकारने दिलं होतं. त्यानुसार, 8 ऑक्टोबरपासून या दोन महिन्यांचेही पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवाळीआधीच सरकारने बोनस दिल्याने पात्र महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.