नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे यांचा तीन महिन्यातील हा दुसरा दौरा असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय.
तर एकीकडे हा दौरा पक्षसंघटनेसाठी असल्याचं बोललं जात असतानाच ठाकरे नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणाशी भेट घेणार का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय.दरम्यान, नागपुरात नेमके कोणते प्रश्न आहेत. त्याबाबत ते जाणून घेऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून नव्या शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
आजचा हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून राज्यातील सर्वच नेते सध्या नागपुरात दाखल झालेले आहेत. आणि अशातच राज ठाकरेंचा नागपूर दौरा असल्याने ते कोणाल भेटणार का? कारण मागील दौऱ्यादरम्यान त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली होती त्यावेळी देखील राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावण्यात आले होते.तेव्हा देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं. तसेच एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यामुळं आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.
अद्याप तरी राज ठाकरे कोणत्याही राजकीय नेत्यांना भेटणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली नसून मात्र राजकीय नेते ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पक्षाच्या संघटनासाठी हा दौरा असून ते राज्यातील विविध भागातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. हा दौरा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी करण्यासाठी असल्याचं दिसून येत आहे.