नवी दिल्ली : कोरोनाचे सावट अद्यापही कायम असताना आणखी एका आजाराने जगाला विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. मंकीपॉक्स (Monkeypox) या आजाराने डोके वर काढले असून जगभरात या रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आतापर्यंत एकूण ११ देशांमध्ये मंकीपॉक्स आढळून आल्याचे सांगितले आहे. सोबतच भारताला धोक्याचा इशारा डब्लूएचओने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सावध झाले असून मंकीपॉक्सला रोखण्यासाठी कंबर कसली आहे.
मंकीपॉक्सचा धोका ओळखून राज्य सरकारने या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी पूर्वतयारी करण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्या प्रवाशाला क्वारंनटाईन करण्यात येणार आहे. शिवाय, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact tracing) करुन संशयितांना क्वारंनटाईन केले जाणार आहे. मंकीपॉक्सवर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात २८ बेडचा विशेष वॉर्ड तयार केला आहे. सोबतच कोठेही संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ कस्तुरबा रुग्णालयास कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनानंतर मंकीपॉक्स वेगाने पसरत असून आतापर्यंत एकूण ११ देशांमध्ये ८० प्रकरणे समोर आल्याचे डब्लूएचओने सांगितले आहे. ब्रिटन, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन आणि काही युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स हातपाय पसरत आहे. अफ्रिका खंड वगळता बाहेरच्या देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे कमी प्रमाणात आहे. परंतु, वेळीच धोका ओळखून याला प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने भारतानेही त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे मंकीपॉक्स?
मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ आजार असून याचा संसर्ग सौम्य प्रकारातील आहे, मंकीपॉक्स मुख्यतः आफ्रिकेतील काही भागांमध्ये संक्रमित वन्य प्राण्यांपासून होतो. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, १९५८ मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो प्रथम आढळले होता. याचा १९७० मध्ये पहिले मानव संक्रमण अफ्रिकेतील ९ वर्षाच्या मुलाला झाले होते. मंकीपॉक्सच्या लक्षणांची सुरुवात कमीत-कमी ६ ते १२ दिवसांआधीपासून दिसण्यास सुरु होतात. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, एनर्जी कमी होणे आदी लक्षणे दिसतात. यासोबतच अंगावर विचित्र झुबकेदार पुरळ येतात.