आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून शिंदे समर्थक आमदार आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.
शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिंदे समर्थक कार्यकर्ते समृद्धी महामार्गावरुन मंगळवारीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, उदघाटन झाले नसतानाच समृध्दी महामार्गाचा वापर कसा काय केला यावर आता आरोप केले जात आहे. यावरुन काँग्रेसचे जालना मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, “समृद्धी महामार्ग सामान्य लोकांसाठी बंद आहे. मात्र वैजापूरपर्यंत त्यांनी (शिंदे गट समर्थकांनी) समृद्धी महामार्गावरुन प्रवास केला. त्यांना कोणी परवानगी दिली? यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवेत. शासनाकडून अपेक्षा आहे की तुम्ही गुन्हे दाखल करा. सामान्य माणूस गेला तर त्याच्याकडून दंड आकारला जातो आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. हे कोण राजा-महाराज आहेत का? त्यांना काय सर्व माफ आहे का?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, “मला आमच्या अधिकृत लोकांकडून माहिती मिळाली आहे. शिंदे गटाची रॅली माझ्या घरासमोरुनच गेली. १०० पर्यंत गाड्या होत्या. यांनी दावा केला आहे की १५०० गाड्या गेल्या. मात्र त्या दिसल्या नाहीत. तरी १०० च्या आसपास गाड्या नक्की गेल्या,” असे सांगितले.