महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. त्यात मराठवाड्याला सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसतायत, अशातच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे नेमके कुठे आहेत? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा आसमानी संकटाचा सामना शेतकरी करतो आहे. मात्र कृषी मंत्र्यांचा आधार हा शेतकऱ्यांना मिळत नाहीये.
मागील 45 ते 50 दिवस राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. त्यामुळे मूलभूत इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष देखील झाल्याचं दिसून आलं. पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्न समोर येत आहेत. त्यात दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला करावा लागत आहे.
शासन म्हणून कृषिमंत्र्यांनी या परिस्थितीकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यात शेतकऱ्यांना आधार मिळणं देखील गरजेचे आहे. मात्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सध्या युएसए मधील अटलांटा शहरात कुटुंबासमवेत असल्याची माहिती मिळालीय. मंत्री धनंजय मुंडे हे वैयक्तिक कामानिमित्त कुटुंबासमवेत या ठिकाणी आहेत. मात्र महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला आधार देणे गरजेचे आहे.
13 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली, त्यामुळे 13 तारखेपर्यंत मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात तळ ठोकून होते. त्यानंतर दोन दिवसानंतर त्यांनी जिल्हा प्रशासना समवेत खरीप हंगाम पूर्व आणि दुष्काळ नियोजन संदर्भात बैठक घेतल्याचं त्यांच्या विभागाकडून सांगण्यात आलं. मात्र त्यांनी केलेल्या सूचना प्रत्यक्षात उतरल्या आहेत की नाही? याचा पाठपुरावा कोण करणार असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे.