देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यासाठी हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. देशभरातील 20 कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक देशभक्ताने का राबवावी घरघर तिरंगा मोहीम जाणून घेऊ या...
देशाला स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक ज्ञात, अज्ञात लोकांनी बलिदान दिले. तन, मन, धन दिले...आपल्याकडे होते न होते त्या सर्वाची आहुती स्वातंत्र्याच्या यज्ञासाठी दिली. या सर्वांच्या बलिदानानंतर देश स्वातंत्र झाला. या सर्वांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
देशात अतिरिक्यांच्या कारवाया होत असतात. या दहशतवाद्यांना टिपतांना जवान शहीद होतात... जवानांचे हे बलिदान देशासाठी, देशवासियांसाठी असते. या बलिदानासंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
देशाच्या सीमेच्या संरक्षण करतांना अनेक वेळा जवान शहीद होतात. त्यांच्यांघरी जेव्हा हा संदेश येतो, त्यावेळी घरातील सर्वात युवा आता परिवारात नसल्याचे समजते. त्या परिवाराच्या या बलिदानासंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
देशाच्या सीमेवर आपले जवान 24 तास डोळ्यांत तेल घालून पाहारा देत असतात. सीमेवर ते सदैव दक्ष असल्यामुळे आपण देशात सुरक्षित राहू शकतो. त्यांच्यासंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
उरीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. अतिरिक्यांच्या कट, कारस्थानात शहीद झालेल्या जवानांसंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच घर घर तिरंगा आहे...
जवान सीमेवर तैनात असतात तर देशांतर्गंत सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असती. हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे यांच्यांसारख्या अनेक पोलिसांनी आपल्यासाठी प्राणांची आहुती दिली. या सर्व पोलिसांसंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
कोरोनासारख्या महामारीचा काळ होता. आपल्याकडे औषधी नव्हती, लस नव्हती. त्याकाळात आपल्यासाठी अनेक डॉक्टर, आरोग्य सेवकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. त्यांच्या बलिदानासंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
देशातील शास्त्रज्ञ दिवस-रात्र एक करुन नवनिर्मिती करत असतात. या काळात आपल्या कुटुंबियांचाही त्यांना विसर पडतो. फक्त देशाचा ध्यास त्यांना असतो. अशा सर्व ज्ञात-अज्ञात शास्त्रज्ञांच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
व्यापारी, उद्योजक प्रचंड मेहनत करुन उद्योग उभारतात. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भरारीत त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यांच्यांकडून मिळणाऱ्या करातून अनेक प्रकल्प, पायाभूत सुविधांची निर्मिती होते, या सर्वांचा गौरव करण्यासाठी घर घर तिरंगा आहे....
शासन, प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी आपले कुटुंब विसरुन जनतेसाठी सतत काम करत असतात. या सर्वांच्या कामासंदर्भात आभार व्यक्त करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी अनेक जण आपला खारीचा वाटा उचलत असतात. त्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या कामांतून देशसेवा करत असतो. त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी घर घर तिरंगा आहे...
नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे घर घर तिरंगा मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर तिरंगा योजनेसाठी एक वेबसाइट सुरू केली आहे. ज्यामध्ये देशाचा कोणताही नागरिक झेंडा लावू शकतो आणि आपली देशभक्ती दाखवण्यासाठी तिरंगा ध्वजासह सेल्फी काढू काढून harghartiranga.com या वेबसाइटवर पोस्ट करू शकतो. तर तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हा आणि इतरांना सहभागी करुन घ्या...