प्रशांन्त जगताप, सातारा : मॉलमध्ये वाईन विक्रीबाबत शंभूराजे देसाई यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय की, मॉलमध्ये वाईन विक्री संदर्भात राज्यात गदारोळ उठणारे वक्तव्य मी केलं नाही. मागच्या सरकारने हा घेतलेला निर्णय यावर जनतेचा अभिप्राय आणि जनतेचे मत मागण्यासाठी लोकांच्या हरकती आपण मागवला होत्या. याबाबतचा अहवाल जेव्हा माझ्याकडे येईल त्यावेळेस मी स्वतः त्यावर माझं मत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर करून मग आम्ही मिळून मंत्रिमंडळात निर्णय घेऊ असे सांगितलं आहे.
आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थाची परवानगी मागितली होती आणि ठाकरे गटानेही याच ठिकाणी मागितली होती. ती परवानगी आम्हाला न मिळता ठाकरे गटाला मिळाली असून कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने दसरा मेळाव्याचे आयोजन करू. आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराच सोनं लुटण्याचा अधिकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. वंदनिय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचे सोने आम्ही दसरा मेळाव्याला लुटणार आहे.
आजच्या दसरा मेळाव्याच्या निकालाबाबत कोर्टात जाण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून बिकेसीच्या मैदानाची मागणी केली आहे. तेथे जोरदार मेळावा घेण्याची आमची तयारी सुरू झाली आहे अस देसाई यांनी सांगितलं आहे.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी मधील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आता जिल्ह्यात आठ पैकी चार राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार शिल्लक राहिले आहेत. अजित दादांना सातारा जिल्ह्यात 2024 मध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाल्याचे दिसले असे सांगत विरोधीपक्ष नेते अजित पवारांवर निशाण साधत आमदार शशिकांत शिंदेंना खोके घेऊनच पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाला सांगावे आणि 50 खोके घ्यावे असे सांगत राष्ट्रवादी पक्षावर हल्लाबोल केलाय.