Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : पहिल्या चार टप्प्यातच आपण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला आहे. अभूतपूर्व विजयाकडे आपली वाटचाल सुरु आहे. २०१४ नंतर देशासोबत मुंबईत झालेला बदल आपण सर्वांनी बघितला आहे. २०१४ नंतर आपल्याला मुंबईत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अनेक बदल आपण त्याठिकाणी केले. सर्व म्हाडाचा परिसर आहे. या म्हाडाच्या ५६ वसाहतींमध्ये आम्ही सेवा शुल्क माफ केला. ३८० कोटी रुपयांचा भुर्दंड संपवण्याचं काम केलं आहे. सामान्य मुंबईकराला घर मिळालं पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. वर्षानुवर्षे ज्यांनी मुंबईत राज्य केलं. मुंबईवर २५ वर्ष राज्य केल्यानंतरही सामान्य मुंबईकरांच्या घराचा प्रश्न तुम्ही का सोडवू शकले नाहीत? त्याच्या जीवनात तुम्ही परिवर्तन का आणू शकले नाहीत, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. ते उत्तर-मध्य मुंबईत महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
आज म्हाडात मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरु केला आहे. त्यासोबत मुंबईत स्वयंपुनर्विकास आपण सुरु केला. ज्या माध्यमातून मुंबईत लोकांना बिल्डरांच्या घशात जाण्याऐवजी स्वत:च स्वत:चा विकास करता येईल. मुंबईतला सामान्य माणूस या स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून स्वत:चं घर मिळवत आहे. जवळपास १४ हजार सेज बिल्डिंगचा पुनर्विकास करण्याच्या संदर्भात कायदा केला. राष्ट्रपतींकडून कायदा मंजूर करून आणला. आता लोकांना स्वत:चं घर मिळेल. पहिल्या चार टप्प्यातच आपण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, एफएसआयच्या धोरणात बदल करण्याचं काम केलं. नागरिकांच्या हिताचं काम करुन परिवर्तन केलं. त्यातून मोठ्या प्रमाणात या वसाहतींच्या पुनर्विकासात अतिशय सुलभता आणली. म्हाडाच्या पुनर्विकाच्या संदर्भात ज्या गोष्टी सुलभतेनं करता येतील, ते आपण केलं. त्यातील अडथळे दूर केले. काही ठिकाणी खासगी बिल्डरांमुळे वसाहतींचा विकास अडला होता. त्यामध्ये आपण बदल केला. खासगी विकासकासोबत जिथे आवश्यक असेल तिथे म्हाडा विकासकाचं काम करेल आणि म्हाडाच पुनर्विकासाचं काम करेल, अशाप्रकारचा निर्णय घेतला. विक्री असेल, हस्तांतरण असेल, यासंदर्भातील अनेक निर्णय मागच्या काळात आम्ही घेतले.