महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असताना केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस नेत्या आणि राहुल यांची बहीण प्रियांका गांधी आघाडीवर आहेत. त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर पिछाडीवर आहे.
प्रियंका गांधी वायनाडमधून ४८२३९ मतांनी आघाडीवर आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी सलग दुसऱ्यांदा या जागेवरून विजयी झाले होते. त्यांनी सीपीआय(एम) उमेदवार ॲनी राजा यांचा 3 लाख 64 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत वायनाड व्यतिरिक्त, राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. दोन्ही जागा जिंकल्यानंतर राहुल यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आणि प्रियांका गांधींना येथून पोटनिवडणुकीत उतरवले.
यावेळी वायनाडमध्ये 16 उमेदवार रिंगणात आहेत. प्रियंका पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीने (LDF) सत्यान मोकेरी यांना उमेदवारी दिली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे.