ज्ञानेश्वर पवार, नागपूर
नागपूर शहरातील अनेक भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. कन्हान येथील जलशुध्दीकरण प्रकल्पात काही तांत्रिक अडचणी होत आहेत. त्यामुळे सातत्याने होणारी गळती बघता त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उदया 20 सप्टेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
दक्षिण, उत्तर आणि पूर्व नागपूरमधील अनेक भागात पाणी पुरवठा बंद राहणार असून या काळात टँकरमधूनही पाणी पुरवठा केला जाणार नाही आहे. या भागातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
भारतवाडी, कळमना, सुभाननगर, मीनीमाता नगर, भांडेवाडी, लकडगंज, बाबुलबन, पारडी, शांतीनगर, वांजरी, कळमना, नंदनवन, ताजबाग, खरबी, सक्करदरा, वाठोडा, बिनाकी, उप्पलवाडी, इंदोरा, बेझनबाग, बस्तरवाडी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.