आयपीएल २०२४ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची निराशाजनक सुरुवात झालीय. पहिल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये आरसीबीचा पराभव झाला. शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा ६ विकेट्सने पराभव केला. विराट कोहलीने वादळी खेळी करून शानदार शतक ठोकलं. विराट कोहलीच्या नाबाद ११३ धावांच्या जोरावर आरसीबीने राजस्थानला १८४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. परंतु, राजस्थानने आरसीबीने दिलेलं लक्ष्य गाठल्याने विराटची शतकी खेळी व्यर्थ ठरली. आरसीबीने सामना गमावला पण विराट कोहलीच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली.
विराट कोहलीने रियान परागचा झेल घेऊन आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वात जास्त झेल पकडले आहेत. याआधी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. परंतु, विराटने आता रैनाचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने ११० झेल पकडून अव्वल स्थान गाठलं आहे. तर दुसऱ्या स्थानावर सुरेश रैना असून त्याने आयपीएलमध्ये १०९ झेल घेण्याची कामगिरी केली आहे. सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्ससाठी हा कारनामा केला होता. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू किरन पोलार्ड या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
पोलार्डने १०३ झेल घेतले आहेत. तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर असून त्याने डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी एकणू ९९ झेल घेतले आहेत. पाचव्या स्थानावर रविंद्र जडेजा आणि शिखर धवन आहे. या दोघांनी प्रत्येकी ९८ झेल घेतले आहेत. शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जसाठी ९८ झेल घेतले आहेत. तर जडेजाने चेन्नई, गुजरात लायन्स, कोच्ची आणि राजस्थान रॉयल्ससाठी ९८ झेल घेतले आहेत.