Yuvraj Singh On Virat Kohli : इंडियन प्रीमियर लीग अंतिम टप्प्यात पोहोचली असून आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपची क्रीडाविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. आयसीसीची ही मोठी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. युवराजने विराटचं कौतुक करत म्हटलं की, तो आणखी एक वर्ल्डकप मेडल जिंकण्याचा दावेदार आहे.
आयसीसीसोबत संवाद साधताना युवराज सिंग म्हणाला, विराट कोहलीने या युगात सर्व विक्रमांना मोडीत काढलं आहे. तो या पिढीच्या क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. विराट वर्ल्डकपमध्ये आणखी एक मेडल जिंकण्याचा दावेदार आहे. त्याला आतापर्यंत मिळालेल्या वर्ल्डकपमध्ये तो समाधानी नसेल, असं मला वाटतं. तो मेडल जिंकण्याचा दावेदार आहे.
युवराज पुढे म्हणाला, विराट कोहलीला त्याच्या खेळाबद्दल खूप समज आहे. जर तो खेळपट्टीवर आहे, तर शेवटच्या क्षणी भारत विजयी होऊ शकतो, हे त्याला माहित आहे. मोहालीत ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात विराटची खेळी पाहू शकता. तो परिस्थिती पाहून फलंदाजी करतो. कोणत्या गोलंदाजाला मोठे फटके मारायचे आहेत आणि कोणत्या गोलंदाजीवर सावध खेळी करायची आहे, हे त्याला माहिती आहे.
नेट्समध्ये जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा असं वाटतं विराट मैदानात खेळत आहे. चेंडू पाहून तो फलंदाजी करत असतो, तो सतत आक्रमक खेळी करत नाही. यंदाच्या आयपीएल हंगामात विराट कोहलीनं धावांचा पाऊस पाडला आहे. लीगमध्ये त्याने सर्वात जास्त धावा केल्या आहेत. कोहलीने ११ सामन्यांमध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या जोरावर ५४२ धावा केल्या आहेत.